२४ सप्टेंबर – चालू घडामोडी । 24 September Current Affairs

24 September Current Affairs 2022

विश्लेषण : टाटा स्टीलची ‘मेगामर्जर’ योजना काय :

  1. टाटा समूहातील आणि धातू क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा स्टीलने मोठी विलीनीकरण योजना (मेगामर्जर प्लॅन) आखली आहे. ती योजना नेमकी काय आहे, कशी पार पडेल, याबद्दल जाणून घेऊया…
  2. टाटा स्टीलची मेगा मर्जर योजना काय – टाटा समूहाने त्यांच्या समूहातील सर्व धातूनिर्मिती कंपन्यांचे कामकाज एकाच छत्राखाली आणण्याचे निश्चित केले आहे. समूहातील सर्व धातू कंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. टाटा समूहातील भांडवली बाजारातील सूचिबद्ध चार आणि सूचिबद्ध नसलेल्या तीन अशा एकूण सात कंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये विलीनीकरण करण्यात येईल.
  3. कोणत्या कंपन्यांचे विलीनीकरण होणार – टाटा समूहातील टाटा मेटॅलिक्स, टिनप्लेट, टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स, टीआरएफ या चार भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचा विलीनीकरणात समावेश आहे. इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स, टाटा स्टील मायनिंग लिमिटेड आणि एस अँड टी मायनिंग कंपनी या तीन सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांचेदेखील विलीनीकरण करण्यात येईल.
  4. विलीनीकरणाच्या बदल्यात इतर कंपन्यांच्या विद्यमान भागधारकांना काय मिळणार – टाटा मेटॅलिक्सच्या १० समभागांच्या बदल्यात विलीनीकरणानंतर टाटा स्टीलचे ७९ समभाग मिळतील. टिनप्लेटच्या भागधारकांना १० समभागांच्या बदल्यात टाटा स्टीलचे ३३ समभाग मिळतील.
  5. मेगामर्जर योजनेचा टाटा स्टीलवर काय परिणाम होणार – ही योजना धातू कंपन्यांची समूह रचना सुलभ करण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे. एकत्रीकरणामुळे वाहतूक आणि दळणवळण (लॉजिस्टिक), खरेदी धोरण आणि विस्तार योजनांसाठी सर्व प्रकल्पांमध्ये योग्य समन्वय साधता येणार आहे. एडलवाइज सिक्युरिटीजच्या मते, मेगामर्जरचा टाटा स्टीलच्या समभागावर फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

पत्रकाराचा ‘हिजाब’ला नकार ; इराणच्या अध्यक्षांची मुलाखत रद्द

  1. सीएनएनच्या ज्येष्ठ पत्रकार क्रिस्टीन अमानपोर यांनी केस झाकण्यास नकार दिल्यामुळे इराणचे अध्यक्ष अहमद रईसी यांनी मुलाखत रद्द केली. संयुक्त राष्ट्र महासभेच्या पाश्र्वभूमीवर बऱ्याच आधी ही मुलाखत निश्चित झाली होती. मात्र मुलाखत सुरू होण्याच्या काही क्षण आधी क्रिस्टिना यांनी हिजाब परिधान करावा, अशी मागणी रईसी यांनी केली. त्याला क्रिस्टिना यांनी स्पष्ट नकार दिला.
  2. ‘‘मी अत्यंत आदराने सीएनएनकडून, वैयक्तिक पातळीवर आणि सर्व महिला पत्रकारांच्या वतीने केस झाकण्यास नकार दिला. कारण त्याची काहीच गरज नाही,’’ असे अमानपोर म्हणाल्या. तेहरानमध्ये जन्मलेल्या अमानपोर यांनी इराणमध्ये वार्ताकन करताना नेहमीच हिजाब वापरल्याचेही स्पष्ट केले.
  3. पोलीस कोठडीत तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये अद्याप हिंसक निदर्शने सुरूच असून यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २६पेक्षा जास्त असल्याचा दावा एका इराणी वाहिनेने केला. दुसरीकडे सरकारला पाठिंबा देण्यासाठीही राजधानी तेहरानसह अनेक शहरांत मोर्चे निघाले.
  4. माशा अमिनी या २२ वर्षीय तरुणीचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे इराणमध्ये हिंसक आंदोलन सुरू आहे. हिजाब नीट घातला नसल्याचा आरोप करत संस्कृतिरक्षक पोलिसां’नी तिला अटक केली होती.

म्यानमारमध्ये भारतीयांना बनवले बंधक, करुन घेतली जातात ‘ही’ कामे; अन्यथा…

  1. नोकरी देण्याच्या आमिषाने भारतीयांना म्यानमारमध्ये बंधक बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आंतरराष्ट्रीय टोळीने केरळातील ३० लोकांना म्यानमारच्या म्यावाड्डी येथे एका संकुलात बंधक बनवले आहे. त्यांच्याकडून सायबर गुन्हेगारीसारखी काम करून घेतली जात आहे. काम करण्यास नकार दिला तर, विजेचे झटक्यांनी त्यांचा छळ करण्यात येत असल्याची माहिती मिळतं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिलं आहे.
  2. म्यानमारमधील म्यावाड्डी येथे ‘अब्ज-डॉलर कसिनो आणि पर्यटन संकुल’ आहे. या संकुलात भारतीयांना बंधक बनवून ठेवण्यात आलं आहे. येथून सुटलेल्या केरळच्या नागरिकाने म्हटलं की, येथे काही लोक शसस्त्र हत्यारांसह परिपूर्ण आहेत. बंधिस्त केलेल्या लोकांकडून १६ तास काम करुन घेतले जाते. त्यांना खाण्यास काही दिले जात नसून, गोळ्या घातल्या जातील या भितीने मानसिक दबावाखाली ते आहेत. त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. त्यांना फोन वापरण्यासाठी कठोर निर्बंध आहेत.
  3. या बंधिस्तांकडून दररोज डेटा चोरीसारखी कामे करुन घेतली जातात. यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील लोकांना लक्ष केले जाते. काम करण्यास मनाई केली तर, त्यांना मारहाण आणि उपाशी ठेवण्यासारखे प्रकार घडत असल्याचं दुसऱ्या एका नागरिकाने सांगितलं.

दिलीप तिर्की ‘हॉकी इंडिया’च्या अध्यक्षपदी ; प्रथमच एखादा खेळाडू संघटनेच्या प्रमुख पदावर

  1. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्कीची ‘हॉकी इंडिया’ संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ‘हॉकी इंडिया’च्या अध्यक्षपदासाठी प्रतिस्पर्धी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर शुक्रवारी तिर्कीची निवड निश्चित झाली. संपूर्ण कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली असून, याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) मान्यता दिली आहे. ‘हॉकी इंडिया’चे अध्यक्षपद भूषविणारा तिर्की हा पहिला हॉकीपटू ठरणार आहे. 
  2. ‘एफआयएच’ आणि प्रशासकीय समितीने ऑगस्टमध्ये ‘हॉकी इंडिया’ला ९ ऑक्टोबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. तिर्कीने १८ सप्टेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश हॉकीचे प्रमुख राकेश कटय़ाल आणि हॉकी झारखंडचे भोलानाथ सिंग यांनीही अर्ज भरले होते. मात्र, निवडणुकीपूर्वीच त्यांनी माघार घेतल्याने तिर्कीची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी माघार घेतल्यानंतर भोलानाथ सिंग यांची ‘हॉकी इंडिया’च्या सरचिटणीसपदी वर्णी लागली.
  3. अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तिर्कीने भारतीय हॉकीला नव्या उंचीवर नेण्यासाठी मी कटिबद्ध असेन, असा विश्वास व्यक्त केला. ‘एफआयएच’नेही निवडणुकीला मान्यता देताना तिर्कीचे अभिनंदन केले. ‘‘प्रशासकीय समितीने ‘हॉकी इंडिया’ची निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल तिर्कीचे अभिनंदन.’’ असे ‘एफआयएच’ने म्हटले आहे.
Spread the love

Leave a Comment