२३ सप्टेंबर – चालू घडामोडी । 23 September Current Affairs

23 September Current Affairs 2022

जगात किती मुंग्या आहेत? संशोधकांनी शोधून काढली आकडेवारी; हा आकडा वाचून नक्कीच थक्क व्हाल

  1. आकाशामध्ये किती तारे आहेत असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच कधीतरी पडला असणार. असेच प्रश्न अनेकदा अनेक गोष्टींबद्दल पडतात. पण शास्त्रज्ञांनी अशाच एका अजब प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं आहे. तर हा प्रश्न आहे, पृथ्वीवर किती मुंग्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर सोमवारी प्रकाशित करण्यात आलेल्या ‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या अहवालात देण्यात आलेलं आहे.
  2. विशेष म्हणजे मुंग्यांची संख्या ही पूर्वी अंदाज वर्तवण्यात आलेल्या संख्येपेक्षा २० पटीने अधिक आहे. याबद्दलचं वृत्त सीएनएनने दिलं आहे.
  3. “आम्ही आधीच्या आकडेवारीबद्दल काही बोलणार नाही. मात्र ती आकडेवारी ही केवळ अंदाज होता. त्यांच्याकडे काही ठोस माहिती उपलब्ध नव्हती. मात्र आमच्या अभ्यासाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही अनेक गोष्टींचा अभ्यास करुन पुराव्यांसहीत माहिती गोळा करुन हा अहवाल सादर केल आहे,” असं या अहवालाच्या लेखकांपैकी एक असणाऱ्या सॅबीन एस. नोटेन यांनी सीएननशी बोलताना सांगितलं.
  4. पुर्वीच्या अंदाजाप्रमाणे जगभरातील मुंग्यांची संख्या ही एक क्वाड्रेलियन आणि १० क्वाड्रेलियनच्या दरम्यान असल्याचं जैवशास्त्रज्ञ बर्ट होल्डोब्लेर आणि एडवर्ड ओ. विल्सन यांनी म्हटलं होतं.
  5. जगभरातील एकूण किटकांच्या संख्येपैकी मुंग्यांची संख्या ही एक टक्का असल्याचं गृहित धरुन ही आकडेवारी काढण्यात आली होती. नव्या संशोधनामध्ये जगभरातील माहितीचा अभ्यास करुन, मुंग्यांसंदर्भातील ४६५ वेगवेगळ्या अभ्यास अहवालांचे आणि उपलब्ध कागदपत्रांचं वाचन करुन एक हजार ३०६ ठिकाणांवरुन नमुने गोळा करण्यात आले.

सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदक

  1. नाटय़क्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा  लेखक पद्यश्री सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आले. गौरवपदक, २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण ५ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे. अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा गुरुवारी सांगलीत केली.
  2. आळेकर यांनी रंगभूमीशी संबंधित विविध क्षेत्रात लीलया संचार केला आहे. सन १९७३ सालापासून १९९२ पर्यंत थिएटर अकादमी संस्थेचे व्यवस्थापक पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. सन १९९६ ते २००० या कालावधीत पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महानिर्वाण’, ‘महापूरसारख्या’ नाटकाचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच ‘झुलता पूल’, ‘मेमरीख् भजन’,‘सामना’ आदी एकांकिका, ‘बेगम बर्वे’, ‘शनवार-रविवार’,‘महानिर्वाण’ या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. 
  3. नाटकातून अभिनय करण्याबरोबरच आळेकर यांनी काही मराठी, हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून विविध व्यक्तिरेखा रंगविल्या आहेत. त्यांना पद्यश्री पुरस्कारासह राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कारासह नाटय़क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. 
  4. आद्यनाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाटय़क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हे गौरवपदक देण्यात येते. करोनामुळे दोन वर्षे पदक वितरण सोहळय़ात खंड पडला होता. परंतु आता निर्बंध उठवल्याने यंदा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर ही संस्था गेल्या ८० वर्षांपासून नाटय़क्षेत्रात कार्यरत आहे.

२००८ ची आर्थिक आपटी अचूक वर्तवणारे अर्थतज्ज्ञ म्हणतात ‘दोन वर्ष जगाचं काही खरं नाही’

करोना काळात जागतिक स्तरावर सर्वच देशांमध्ये आर्थव्यवस्था संकटात सापडल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून करोनामधून काहीशी उसंत मिळाल्यानंतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था सावरताना पाहायला मिळत आहेत. मात्र, आत्ता कुठे करोनाचं संकट निवळलं असतानाच एक नवं संकट जगावर ओढवण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. पुढची दोन वर्ष जागतिक पातळीवर भीषण आर्थिक संकट ओढवू शकतं, असा अंदाज अर्थतज्ज्ञ नॉरियल रुबिनी यांनी व्यक्त केला आहे. रुबिनी यांनीच २००८ साली जागतिक मंदीबाबत अचूक भाकित केलं होतं. त्यामुळे, यावेळी त्यांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे जगभरातील सरकार आणि प्रशासनामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
1.काय म्हणाले रुबिनी– एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये रुबिनी यांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे. त्यांच्यामते, पुढील दोन वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी संकटाची ठरू शकतात. चालू वर्षाच्या शेवटपर्यंत अमेरिका आणि जगातील इतर अर्थव्यवस्थांमध्ये दीर्घकाळ चालणारी आणि भीषण अशी आर्थिक मंदी येऊ शकते. आर्थिक संकटाचा हा काळ तब्बल वर्षभर म्हणजे २०२३च्या अखेरपर्यंत चालू राहू शकतो. याचा मोठा परिणाम S&P 500 वरही दिसून येईल. साध्या मंदीमध्येही S&P 500 तब्बल ३० टक्क्यांनी घसरू शकते. शेअर बाजारात ४० टक्के घसरण दिसू शकते, असं भाकित रुबिनी यांनी केलं आहे.

2.‘डॉक्टर डूम’ यांचं भाकित – २००७ ते २००८ या काळातील आर्थिक संकटाचं अचूक भाकित केल्यामुळे नॉरियल रुबिनी यांचं नाव ‘डॉक्टर डूम’ असं पडलं. या आर्थिक संकटाला गांभीर्याने न घेणाऱ्यांना त्यांनी इशाराही दिला आहे. ज्यांना या आर्थिक मंदीचा फटका फारसा बसणार नाही असं वाटतंय, त्यांनी वेगवेगळ्या सरकारांवर आणि कॉर्पोरेशन्सवर असलेल्या कर्जाचा भार एकदा पाहावा, असं ते म्हणाले आहेत. जसजसे कर्जदर वाढतील तसतसा त्याचा संस्थांना, जनसामान्यांना, कॉर्पोरेट क्षेत्राला, बँकांना फटका बसू लागेल”, असं ते म्हणाले.

3. महागाईचा दर कमी करणं अशक्य होऊन बसेल – रुबिनी यांनी अमेरिकेत महागाईचा दर कमी करणं अशक्य होऊ शकतं, असा अंदाज वर्तवला आहे. कठोर निर्णय न घेतल्यास महागाईचा दर २ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचं लक्ष्य गाठणं ही अशक्यप्राय गोष्ट असेल, असं ते म्हणाले.

टाटा समूहातील सहा उपकंपन्या टाटा स्टीलमध्ये विलीन होणार

देशातील नामांकित टाटा समूहाची कंपनी असणारी टाटा स्टील ही आपल्या सहा उपकंपन्या स्वतःमध्ये विलीन करणार आहे. कंपनीकडून शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवारी मंजुरी दिल्याचेही कंपनीच्या वतीने निवेदनात सांगण्यात आले आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की, टाटा स्टीलच्या संचालक मंडळाने टाटा स्टीलमध्ये सहा उपकंपन्यांच्या प्रस्तावित विलीनीकरणाच्या योजनांचा विचार करून त्याला हिरवा कंदील दर्शवला आहे.

  1. या सहा कंपन्या टाटा स्टीलमध्ये विलीन होणार आहेत – टाटा स्टीलच्या ज्या उपकंपन्यांचे विलीनीकरण होणार आहे त्यामध्ये – ‘टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स लिमिटेड’, ‘द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड’, ‘टाटा मेटालिक्स लिमिटेड’, ‘द इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स लिमिटेड, टाटा स्टील मायनिंग लिमिटेड आणि एस अँड टी मायनिंग कंपनी लिमिटेड.
  2. विलीन होणार्‍या दोन उपकंपन्या संपूर्णपणे टाटा स्टीलच्या मालकीच्या – टाटा स्टीलची ‘टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स लिमिटेड’ मध्ये ७४.९१ टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय ‘द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड’मध्ये ७४.९६ टक्के, ‘टाटा मेटॅलिक्स लिमिटेड’मध्ये ६०.०३ टक्के आणि ‘द इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स लिमिटेड’मध्ये ९५.०१ टक्के, तर ‘टाटा स्टील मायनिंग लिमिटेड’ आणि एस अँड टी मायनिंग कंपनी लिमिटेड’ या त्यांच्या पूर्ण मालकीची उपकंपन्या आहेत.
  3. यासोबतच, कंपनीच्या बोर्डाने टाटा स्टीलची उपकंपनी ‘TRF लिमिटेड’चे देखील (३४.११ टक्के भागीदरी) टाटा स्टील लिमिटेडमध्ये विलीन करण्यासही मान्यता दिली आहे.

बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा १८ ऑक्टोबरला ; ‘आयसीसी’ परिषदेसाठी भारताचा प्रतिनिधी निश्चित होणार

  1. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभा १८ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे, अशी माहिती सचिव जय शहा यांनी दिली.
  2. या सभेच्या कार्यक्रमपत्रिकेत महिला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हा एक महत्त्वाचा विषय असेल. याचप्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी निवडणूक होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील (आयसीसी) भारताचा प्रतिनिधीसुद्धा याच सभेत निवडणुकीद्वारे ठरणार आहे. अध्यक्षपदासाठी ७७ वर्षीय क्रिकेट संघटक एन. श्रीनिवासन ५० वर्षीय विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला आव्हान देण्याची दाट शक्यता आहे.
  3. २९ मुद्दय़ांचा कार्यक्रमपत्रिकेत समावेश करण्यात आला आहे, असे राज्य संघटनांना ‘बीसीसीआय’ने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेद्वारे कार्यकारिणी समितीवर स्थान मिळवणाऱ्या एक पुरुष आणि एक महिला अशा दोन जागांसाठीही निवडणूक यावेळी होईल. याचप्रमाणे सर्व स्थायी समित्या, क्रिकेट समिती आणि पंचांच्या समितीचीसुद्धा निवड बैठकीत होईल.
Spread the love

Leave a Comment